नवी दिल्ली(वृत्तसंस्था) – बिहारमधील गोपालगंज येथील २६४ कोटी रुपये खर्चून उभारलेला सत्तरघाट महासेतू पाण्याच्या दबावामुळे कोसळला. एक महिन्यापुर्वीच म्हणजेच १६ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पुलाचे उद्घाटन केले होते.

गोपालगंज येथील गंडक नदीवर सत्तरघाट महासेतू बांधण्यात आला होता. विविध जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा महत्त्वाचा पूल होता. मात्र, तीन लाखांपेक्षा अधिक क्यूसेकने पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाचा एप्रोच रोड तुटला. हा पूल कोसळल्याने चंपारण, तिरहुत आणि सारण येथील अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. हा कोसळलेला पूल पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली आहे.
दरम्यान, महासेतू कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी चौकशी करण्याची मागणी बिहार सरकारकडे केली आहे. यावरून तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर ट्विटरद्वारे निशाणा साधला.







