लातूर (वृत्तसंस्था) – राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत असताना राजकीय वर्तुळातील व्यक्तींही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून निलंगेकरांना प्रकृतीचा त्रास जाणवत होता. त्यांना सर्दी, खोकलाही होता. त्यामुळं त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यात आली होती. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता त्यांच्या कुटुंबीयांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली होती.







