मुंबई (वृत्तसंस्था ) ;– कोरेगाव भीमा प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले ज्येष्ठ कवी वरवरा राव यांना काल (१३ जुलै) रात्री मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चक्कर येत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या काही चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

दरम्यान, वरवरा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अत्यावश्यक सेवा असणाऱ्या रुग्णालयात न्यावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. राव यांची प्रकृती गेले काही दिवस ठीक नसल्याने कारागृहातच त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या पत्नी हेमलता यांनी दिली.
कारागृहात योग्य सुविधा नाही आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे. कारागृह हे राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी त्यात लक्ष घालावी अशी मागणीही करण्यात आली आहे. आत्तापर्यंत राव यांचा जामीन अर्ज ५ वेळा फेटाळण्यात आला आहे. वय, तब्येत आणि कोरोना या पार्श्वभुमीवर त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.







