मुंबई राज्यात मान्सूनच जोरदार आगमन झालं. रविवारी पहाटेपासून मुंबई शहरातही पावसानं चांगलीच फिल्डींग केली आहे. पावसाचा जोर पुढील २४ तासात मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात कायम राहील, अशी शक्यता नुकतीच कुलाबा वेधशाळेनं वर्तविली आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तविली आहे. जून महिन्यात मान्सून वेळेवर दाखल झाला तरी सरासरीपेक्षा पाऊस कमीच पडला. मात्र जुलै महिन्यात सरासरीपेक्षा राज्यात चांगला पाऊस होईल,असं वेधशाळेनं सांगितलं आहे.
पुण्यात पावसानं आठवडाभराची विश्रांती घेतलेली असली तरी खडकवासला धरणाच्या साखळीतील चारही धरणं भरलेली आहेत. मुंबईतील काही उपनगरातही आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरूच आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी सध्या धोक्याची पातळी ओलांडून वाहते आहे. चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्यानं नद्यानाले तुडूंब भरल्या आहेत. यामुळे प्रशासन आणि व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.