सोल (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची बहीण किम यो यांनी दक्षिण कोरियानंतर आता अमेरिकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. किम यो जोंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प यांच्यासोबत बैठक घेऊन वेळ वाया घालावा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर कोरियातील वृत्तसंस्था कोरियन न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग यांची बहीण किम यो जोंग यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामधील बैठकीबाबत दोन्ही देशांचे सर्वोच्च नेते निर्णय घेतील. मात्र, शिखर बैठकीची आवश्यकता उत्तर कोरियाला नसून अमेरिकेला अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर कोरियासाठी अमेरिकसोबत बैठक घेणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे. अमेरिकेपासून उत्तर कोरियाला काही फायदा होणार नसेल तर या बैठकीला काहीच अर्थ नसल्याचे किम यो यांनी सांगितले. अमेरिका उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रमुक्तीबाबत जोवर प्रतिकूल धोरण बाळगून आहे, तोवर अमेरिकेशी कोणतीही चर्चा करण्यास उत्तर कोरियाने याआधी नकार दिला आहे. दक्षिण कोरिया, अमेरिकेबाबतच्या संबंधाचे निर्णय घेण्याबाबत किम यो यांची भूमिका निर्णायक असते. अमेरिका आणि उत्तर कोरिया दरम्यान याआधी झालेल्या बैठकीसाठी किम यो यांनीच पुढाकार घेतला होता. किम यो यांनी किम जोंग यांना बैठकीसाठी राजी केले असल्याची चर्चा होती. त्यामुळेच किम यो यांच्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे.







