मुंबई (वृत्तसंस्था) – पिंपरी-चिंचवडमध्येही ‘करोना’ आजार दाखल झाला आहे. शहरातील पाच संशयितांपैकी तीन रुग्णांना ‘करोना’ची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विदेशवारी करून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चीन व इतर देशांतून शहरात 31 प्रवासी आले होते. राज्य शासनाच्या आदेशानुसार या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात आला. यातील 20 प्रवाशांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यापैकी कुणालाही लागण झालेली नाही. परंतु उर्वरित प्रवाशांपैकी पाच संशयित असल्याचे निष्पन्न झाले. या पाचही संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आले होते. 24 तासांच्या आत आलेल्या अहवालामध्ये पाच पैकी तीन रुग्णांना ‘करोना’ झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.महापालिकेची यंत्रणा सज्ज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ‘करोना’ बाधितांसाठी 10 बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच भोसरीतील नवीन रुग्णालयात 40 बेडचे विलगीकरण शिबिर तयार करण्यात आले आहे. शहरातील एकूण खासगी व पालिकेच्या सात रुग्णालयांमध्ये 48 बेडची सोय करण्यात आली आहे.