नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात झाला असून, त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटापायी बर्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. तसेच अनेकांनी नोकरी देणे बंद केले आहे, परंतु जगातील सर्वात मोठी कंपनी असलेली ऍमेझॉन कोरोनाच्या संकटातही 20000 लोकांना रोजगार देणार आहे. आमच्या ग्राहक सेवा संघात सुमारे 20,000 हंगामी किंवा तात्पुरत्या रोजगाराच्या संधी निर्माण करीत आहोत, अशी माहिती अॅमेझॉन इंडियाने दिली आहे.

यामागील कंपनीचे उद्दिष्ट भारतातील आणि जगभरातील ग्राहकांना मदत करणे हा आहे. ऍमेझॉन इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील महिन्यांत ग्राहकांच्या वाहतुकीची अपेक्षित मागणी पूर्ण करण्यासाठी हैदराबाद, पुणे, कोईंबतूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मंगलोर, इंदूर, भोपाळ आणि लखनऊ येथे नवीन पदं भरली जातील. नवनियुक्त सहकारी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतील, यासाठी ते ईमेल, चॅट, सोशल मीडिया आणि फोन अशा विविध माध्यमांतून वैयक्तिक आणि उत्कृष्टरीत्या सेवा प्रधान करतील.
कसे अर्ज करावे?
>> ऍमेझॉनद्वारे नवीन तात्पुरत्या पदांच्या भरतीसाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. तसेच तो इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलुगू किंवा कन्नड भाषेत पारंगत असावा.
>> कंपनीचे म्हणणे आहे की, यापैकी काही तात्पुरती पदं उमेदवारांच्या कामगिरी आणि व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार वर्षाच्या अखेरीस कायमस्वरूपी केली जाऊ शकतात.
>> ज्यांना या हंगामातील नोकरीसाठी अर्ज करायचा आहे ते 1800-208-9900 वर कॉल करू शकतात किंवा seasonalhiringindia@amazon.comवर ईमेल पाठवू शकतात.
ग्राहकांच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी ग्राहक सेवा संस्थांची नेमणूक
अॅमेझॉन इंडियाचे संचालक अक्षय प्रभू म्हणतात की, ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता ग्राहक सेवा संस्थांमध्ये कामावर घेत असलेले कर्मचारी त्यांच्या गरजांची पूर्तता करतील. भारत आणि जगभरातील सुट्टीच्या मोसमात येत्या सहा महिन्यांत ग्राहकांची वाहतूक वाढेल, असा आमचा अंदाज आहे. आम्ही सामावून घेणारे नवीन सहयोगी आमच्या आभासी ग्राहक सेवा कार्यक्रमाद्वारे घर आणि कार्यालयातून काम करतील आणि ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी आणि त्यांना एक उत्कृष्ट अनुभव देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. ही नवीन तात्पुरती पदं या अनिश्चित काळात उमेदवारांना रोजगाराची आणि जगण्याची साधनं उपलब्ध करून देतील.
7 वर्षांत 7 लाख नोक-या दिल्या
तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये सातत्याने गुंतवणूक करून 2025 पर्यंत 10 दशलक्षाहून अधिक नवीन रोजगारनिर्मिती करण्याची योजना ऍमेझॉनने जाहीर केली. माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, सामग्री तयार करणे, रिटेल, लॉजिस्टिक्स आणि बांधकाम या क्षेत्रांमध्ये निर्माण झालेले रोजगार थेट आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरूपात असतील. ऍमेझॉनच्या गुंतवणुकीमुळे गेल्या सात वर्षांत भारतात सात लाख रोजगार निर्माण झाले आहेत.







