पंढरपूर (वृत्तसंस्था) – यंदा कोरोनामुळे आषाढी वारीसाठी एकही वारकरी भाविक पंढरपुरात येऊ शकणार नाही. त्यामुळे एकादशीच्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाविरोधात लढणाऱ्या सफाई कर्मचारी दाम्पत्याला सहभागी करुन घ्या, अशी मागणी नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी मंदिर प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन वाघमारे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे दिले आहे.

‘दरवर्षी दर्शनाच्या रांगेत पहिल्या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेत सहभागी होण्याचा मान देण्याची परंपरा आहे. मात्र यंदा वारकरीच येणार नसल्याने हा मान कोरोनाविरोधात लढणाऱ्या सफाई कर्मचारी दाम्पत्याला द्या.’
‘सफाई कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार होऊन काम केलं आहे. त्याची पोचपावती म्हणून यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेत सहभागी होण्याचा मान त्यांना द्यावा,’ असे वाघमारे म्हणाले.
आतापर्यंत वर्षानुवर्षे गावं आणि शहरं स्वच्छता करणारा हा वर्ग वारकऱ्यांसाठी गाव स्वच्छ ठेवतो. पण त्याला कधीच मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेता येत नाही. यंदा ही संधी शासनाने दिल्यास या वर्गाला आयुष्यभराचे समाधान मिळेल. यासाठी मंदिर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
‘मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी यायचं असेल तर त्यांना येऊ दिलं पाहिजे. विठ्ठल आमचं आराध्य दैवत आहे. आम्ही त्यांना संपूर्ण आध्यात्मचा राजा म्हणतो. मुख्यमंत्री प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यामुळे हा मुख्यमंत्र्याचा मान नाही, तर हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की, आमच्या राजाची त्यांनी पूजा केली पाहिजे’, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.







