जळगाव (प्रतिनिधी)- सध्याच्या कोरोनाच्या साथीत सगळेच अक्षरश: जीव मुठीत धरून देवाच्या हवाल्याने जगत असताना खाजगी रूग्णालये त्यांचा ताठा न सोडणारी बेपर्वाई सोडत नसल्याचा प्राण कंठाशी आणणारा अनुभव काल पुन्हा आला. मात्र या अनुभवात जिल्हाधिकारी , जिल्हा शल्य चिकीत्सक व अधिष्ठाता देवदुतासारखष धावून आल्याने एका खाजगी रूग्णालयाच्या बेपर्वाइची नांगी जागेवर ठेचली गेली आणि रूग्ण महिलेचे प्राण वाचले ! त्याचवेळी कोरोना साथीत राज्यात आधीच बदनाम झालेल्या या जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सही आता लोकांच्या संतापाचे कारण ठरत आहेत.
साप्ताहिक केसरीराजचे संपादक भगवान सोनार यांना आलेला हा अनभव त्यांच्याच शब्दांत ….

मित्रांनो माझी नातेवाईक महिला चार दिवसापासून डॉ. उल्हास पाटील मेडिकल काँलेज कोव्हीड 19 रुग्णालयात उपचार घेत होती . तिचे वय 50. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि तिची आँक्सिजन पातळी 60 -70 पर्यंत होती. या परिस्थितीमध्ये डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात आँक्सिजन लावून रुग्णांची परिस्थिती आटोक्यात डॉक्टर आणत होते. या परिस्थितीत कोरोना चाचणी करण्यात आली. काल सायंकाळी कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. त्या महिलेला श्वास घेण्यात त्रास जास्त जाणवून आँक्सिजन पातळी 50 पर्यंत आल्याने व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. डॉ उल्हास पाटील रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नव्हता. त्यामुळे जळगावातील अन्य खाजगी रूग्णालयांशी सायंकाळी 6 वाजता रुग्ण महिलेला घेऊन संपर्क साधला मात्र शहरातील एकही हाँस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड रिकामा नव्हता . प्रत्येक हाँस्पिटलमध्ये जागाच नसल्याचे सांगण्यात येत होते. जागा नाही, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही अशा काळजीत तीन तास आठ मोठ्या रूग्णालयांमध्येे फिरल्यानंतर मी व माझे नातेवाईक दमले.
रुग्ण महिलेची प्रकृती खालावत होती. अखेरीस अत्यंत नाईलाजाने मी जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत साहेबांशी याबाबत बोलणे केले. तात्काळ जिल्हाधिकारी राऊत साहेबांनी दखल घेत जिल्हा कोव्हीड19 हाँस्पिटलचे अधिष्ठाता (डीन) रामानंद व सिव्हिल सर्जन डॉ. चव्हाण यांच्याशी बोलून माझी नातेवाईक रुग्ण महिलेला ऑर्किड हाँस्पिटलमध्ये दाखल करण्याचे सांगितले. ऑर्किड हाँस्पिटलला रुग्ण आणल्यावर तेेथे पण रुग्ण बेड खाली नाही. येथून पण परत जाण्याची वेळ आली होती. पण लागलीच ऑर्किड हाँस्पिटलमध्ये जिल्हाधिकारी राऊत साहेब, अधिष्ठाता रामानंद व सिव्हिल सर्जन डॉ. चव्हाण हे तिघेही दाखल झाले. त्यांनी संपूर्ण हाँस्पिटलची पाहणी करुन या रुग्णांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णाची मुले व नातेवाईक यांनी प्रशासनाचे आभार मानले. आता उपचारानंतर व्हेंटीलेटर नसतानाही रुग्ण महिलेची आँक्सिजन पातळी 85 च्या वर आहे.
या रूग्ण महिलेला कोरोना नव्हताच. न्यूमोनिया व दम्यासारख्या त्रासामुळे तिचे श्वास अडखळत होते. मात्र श्वास अडखळ्ण्यामुळे नसलेली झंझट नको म्हणून रूग्णाला हातही न लावणारे व जागाच नाही असे सांगून टाळणारे खाजगी डॉक्टर्स फक्त पैसा कमवायलाच बसलेले आहेत का?, हा प्रश्न आता विचारला जातोयं. आर्कीड रूग्णालयानेही आधी जागा नसल्याचे सांगून या रूग्णाला टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जिल्हाधिकारी , जिल्हा शल्य चिकीत्सक व अधिष्ठातांनी जातीने पाहणी करून उपचारांची सूचना दिल्यावर सगळे सुरळित झाले. दमा व न्युमोनियासारख्या आजाराचा त्रास असलेले मात्र कोरोना विषाणूची लागण झालेली नसलेले जिल्ह्यात असे कित्येक रूग्ण असतील . त्यांनाही ही खाजगी रूग्णालये अशीच वार्यावर सोडणार आहेत का?. हा खरा प्रश्न आहे. काहीच संवेदनशीलता नसलेले असे डॉक्टर्स गरीब रूग्णांना दारात उभेच करणार नसतील तर त्यांच्यापुढे असे शेकडोे राऊत साहेब, रामानंद साहेब व चव्हाण साहेब उभे राहीले तरी त्यांना काहीच फरक पडणार नाही , हा त्यानंतरचा सामान्यांचा संताप कोण लक्षात घेणार आहे?.







