
भडगाव पोलीस स्टेशनचा यशस्वी तपास
भडगाव (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून एका २३ वर्षीय तरुणावर गोळीबार करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला भडगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.

नेमकी घटना काय?
कजगाव (ता. भडगाव) येथील रहिवासी जयेश ज्ञानेश्वर पवार (वय २३) आणि त्याच गावातील मुन्ना उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत यांच्यात दोन ते तीन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून गिरीश राजपूत याने जयेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जयेश कामावर जात असताना गोंडगाव-कजगाव रोडवरील सोलर प्लांटजवळ त्याला गाठून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात जयेशच्या डोक्याला व छातीला गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने धुळे येथील श्री सेवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांची तपासाची चक्रे आणि अटक
या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. भडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश टाक यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी पियुष उर्फ विरु दिलीप पाटील (वय २२, रा. कजगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत मुख्य आरोपी गिरीश राजपूत यानेच गोळीबार केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी मुन्ना उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत याचा धुळे येथे शोध घेऊन शनिवारी, दि. २८ नोव्हेंबर रोजी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश टाक, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोहेकॉ नरेंद्र विसपुते, पोकॉ रविंद्र पवार व पोकॉ दिपक पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.









