
विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची शिकवण सामूहिक वाचन, व्याख्यानमाला, प्रश्नमंजुषा अन् चर्चासत्रातून संविधानाचे महत्त्व अधोरेखित
यावल ( प्रतिनिधी ) : भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात संविधान दिन विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्त सामूहिक वाचन, व्याख्यानमाला, प्रश्नमंजुषा आणि चर्चासत्र अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक प्रशांत महाजन होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. धीरज चौधरी व अॅड. मयूर सुरळकर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास, मूलभूत हक्क व कर्तव्ये तसेच संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व सोप्या व प्रभावी शब्दांत समजावून सांगितले.संविधान हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जीवनाचा आधार आहे.
संविधानातील मूल्यांचे आचरण करून विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि जागरूक नागरिक बनावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.प्रश्नमंजुषा व चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची माहिती मिळण्यासोबतच लोकशाही मूल्यांची जाणीवही झाली.कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.








