
शस्त्रक्रियेने वाचला जीव ; जीएमसीच्या कान, नाक व घसा विभागाची यशस्वी कामगिरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करणे एका १८ वर्षीय तरुणीच्या चांगलेच अंगलट आले. दात साफ करत असताना अचानक सेफ्टी पिन गिळली गेल्याने ती अन्ननलिकेत अडकली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील कान, नाक व घसा विभागाने अत्यंत कौशल्याने ही सेफ्टी पिन यशस्वीरीत्या बाहेर काढली.

अन्ननलिकेत अडकलेली टोकदार सेफ्टी पिन बाहेर काढणे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. प्रक्रियेदरम्यान अन्ननलिकेला छिद्र पडणे, रक्तस्राव होणे तसेच श्वसनमार्गात वस्तू जाणे अशा गंभीर गुंतागुंतींचा धोका होता. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने ही आव्हानात्मक प्रक्रिया पार पाडण्यात आली.
या यशस्वी प्रक्रियेसाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. कान, नाक व घसा विभागप्रमुख डॉ. राजश्री चौरपगार, सहयोगी प्राध्यापक डॉ. अक्षय सरोदे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. ललित राणे, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. विनोद पवार, डॉ. दीपिका ओक व डॉ. अनिकेत दौंड, कनिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. किरण गोरे, डॉ. यश सिसोदे आणि डॉ. साक्षी पोखरणा यांनी प्रक्रियेत सहभाग घेतला.
भूलशास्त्र विभागाचे डॉ. ऋतुराज काकड, डॉ. चेतनकुमार अद्राट, डॉ. नेहा पाटील आणि डॉ. समीर तडवी यांच्यासह मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह इन्चार्ज परिचारिका रूपाली पाटील, अश्विनी सोनवणे यांनीही मोलाचे सहकार्य केले. दोन्ही विभागांच्या समन्वयातून ही आव्हानात्मक प्रक्रिया यशस्वी झाली.
नागरिकांसाठी आवाहन : दात स्वच्छ करण्यासाठी सेफ्टी पिन, सुई किंवा इतर टोकदार वस्तूंचा वापर टाळावा. अशा वस्तू चुकून गिळल्या गेल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.
: डॉ अक्षय सरोदे.








