नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – योगगुरू बाबा रामदेव यांनी करोनावर पहिले औषध शोधल्याचा दावा केला आहे. ‘कोरोनिल’ असे या करोना व्हायरसवर उपचार करण्याऱ्या औषधाचे नाव असून आज बाबा रामदेव यांनी ते लॉन्च केले आहे. या विषाणूचा हरवण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.
पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे कोरोनिल औषध तयार केले आहे. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीकडून ते औषध कशा प्रकारे काम करते याची माहिती दिली आहे. तसेच हे औषध कशा प्रकार तयार करण्यात आले याची माहितीही बाबा रामदेव यांनी दिली.
बाबा रामदेव म्हणाले कि, लोक या औषधावर प्रश्न विचारत असतील. तरीही आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. या औषधाच्या चाचणी रुग्णांवर घेण्यात आल्या असून यातील ६९ टक्के रुग्णांचे अहवाल केवळ तीन दिवसात निगेटिव्ह आले आहे. पुढच्या 7 दिवसांत कोरोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल. यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. या औषधाचा प्रयोग आतापर्यंत २८० लोकांवर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तर आचार्य बालकृष्ण म्हणाले, पतंजली रिसर्च इस्न्टिट्यूटमध्ये यावर पाच महिने संशोधन करण्यात आले असून उंदरांवर याचा चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. तर क्लिनिकल कंट्रोल ट्रायल अंतिम टप्प्यात आहे.







