ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी व्याजासह परत मिळाव्यात; ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना सविस्तर निवेदन
मुंबई (प्रतिनिधी) – BHR मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. यावेळी ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने सहकारमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करून ठेवीदारांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

BHR मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये हजारो ठेवीदारांनी आपल्या कष्टाची कमाई सुरक्षिततेच्या अपेक्षेने जमा केली होती. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या ठेवी अडकून पडल्याने ठेवीदारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत मिळाव्यात आणि त्यांना न्याय मिळावा, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यासोबतच अवसायकामार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा तसेच जमा झालेल्या निधीच्या वितरणाचा सविस्तर तपशील सार्वजनिक करावा, ठेवीदारांना परतावा देण्याची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आजारी ठेवीदार तसेच मृत ठेवीदारांच्या वारसांना प्राधान्याने परतावा देण्याबाबत विचार करावा, ठेवीदारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशा महत्त्वपूर्ण मागण्याही निवेदनात मांडण्यात आल्या.
यावेळी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी ठेवीदारांच्या गंभीर आर्थिक अडचणी तसेच त्यांच्या कुटुंबांवर ओढवलेल्या परिस्थितीची सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना सविस्तर माहिती दिली.
या प्रकरणात शासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक कार्यवाही करावी आणि ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
ठेवीदारांनी आयुष्यभर कष्ट करून जमा केलेल्या पैशांची परतफेड होणे आणि त्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक वर्षांपासून या प्रश्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या ठेवीदारांना दिलासा मिळण्यासाठी शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी मांडली.









