मद्यविक्रेते, जुगारी आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका; ४२ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी ‘ऑपरेशन ऑल आउट’ ही विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धडक कारवाईत विविध गुन्ह्यांखाली लाखोंचा मुद्देमाल आणि मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी, स्थानिक गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेने विशेष पथके तैनात करून अवैध दारू, जुगार, शस्त्रे, अमली पदार्थ आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली.
हातभट्टी दारूविरोधात मोठी मोहीम राबवत पोलिसांनी १२४ गुन्हे दाखल केले आणि १२० आरोपींवर कारवाई केली. यात ५ हजार ७२५ लिटर गावठी दारू आणि २८ हजार ९७२ लिटर रसायन असा एकूण २० लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. देशी-विदेशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी १२ गुन्हे दाखल करत १२ आरोपींकडून ६१ हजार ८०५ रुपयांचा साठा जप्त केला. जुगार कायद्यान्वये ४६ गुन्ह्यांमध्ये ६० आरोपींना ताब्यात घेऊन ९१ हजार ३३० रुपये जप्त केले. तसेच शस्त्र अधिनियमान्वये दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपींकडून दोन तलवारी हस्तगत केल्या.
अमली पदार्थांविरोधात ११ गुन्हे दाखल करून ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त केला. वाहतूक शाखेने मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ८७ जणांवर, विनाहेल्मेट १३३, महामार्गावर अनधिकृत पार्किंग करणाऱ्या ६१ आणि इतर नियमभंग करणाऱ्या १ हजार ५७ वाहनचालकांवर कारवाई करत एकूण ११ लाख ६९ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या ७३ मद्यपींवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
मोहिमेदरम्यान ५०७ सराईत गुन्हेगारांची तपासणी करून ११ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर ८ हद्दपार आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी ३७६ समन्स आणि १६१ वॉरंट बजावले. याशिवाय १९० भंगार दुकानांची तपासणी करून ५ जणांवर कारवाई केली, तर कोटपा कायद्यान्वये १०० पानटपऱ्यांवर गुन्हे दाखल करून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. जिल्ह्यातील १८० हॉटेल्स आणि लॉजेसचीही तपासणी करण्यात आली.
या मोहिमेमुळे बेपत्ता झालेल्या ५ महिला, ७ पुरुष आणि ५ मुली अशा एकूण १७ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. तसेच सीईआयआर पोर्टलच्या मदतीने चोरीस गेलेले आणि हरवलेले ४२ मोबाईल फोन हस्तगत करून ते मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली. जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तींना थारा दिला जाणार नसून अशा मोहिमा यापुढेही सुरूच राहतील, असा इशारा पोलीस दलातर्फे देण्यात आला आहे.









