मध्यप्रदेशासह तीन जिल्ह्यांतून समाजबांधवांची उपस्थिती; काझीपुरा मस्जिदमध्ये प्रवचन, शहरात उत्साहाचे वातावरण
यावल ( प्रतिनिधी ) :- दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धार्मिक धर्मगुरू परमआदरणीय हिज होलीनेस डॉ. मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांचे सोमवारी सायंकाळी यावल शहरात आगमन झाले. त्यांच्या आगमनाने दाऊदी बोहरा समाजबांधवांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या दर्शनासाठी मध्यप्रदेशासह जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतून हजारो समाजबांधव यावलमध्ये उपस्थित झाले होते.

शहरातील बुरूज चौकात धर्मगुरूंचे आगमन झाल्यानंतर मुख्य मार्गावरून समाजाच्या मस्जिदपर्यंत त्यांची स्वागतयात्रा काढण्यात आली. या मार्गावर समाजबांधवांनी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर काझीपुरा येथील मस्जिदमध्ये आयोजित प्रवचनातून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहून त्यांचे दर्शन घेतले.
धार्मिक कार्यक्रमानंतर धर्मगुरूंनी शहरातील दाऊदी बोहरा समाजाच्या पिठाच्या गिरणीला तसेच स्कायएस जोहर कलर पॉइंट आणि कुर्बान हुसेन मोहंमद अली यांच्या दुकानाला भेट दिली. यानंतर ते भुसावळकडे रवाना झाले.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यावल पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक एम. जे. शेख, उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.









