नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ठाणे सेंट्रल जेलमध्ये कार्यरत असलेल्या चार पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तुरूंग महानिरीक्षक दीपक पांड्ये यांनी ही माहिती दिली. संबंधित कर्मचार्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याशिवाय चौघ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
बंदोबस्त आणि ड्युटी करताना राज्यातील बहुतांश पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दलात खळबळ उडाली आहे. त्याशिवाय मृत्यूमुखी पडणार्या कर्मचार्यांची संख्याही मोठी असल्यामुळे पोलिस कुटूंबियांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात काल 992 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे करोना रुग्णांची एकूण संख्या आता 21 हजार 558 इतकी झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत 254, ठाणे शहरात 164, नवी मुंबईत 154, भिवंडीत 170, अंबरनाथमध्ये 19, उल्हासनगरमध्ये 51, बदलापूरमध्ये 25, मीरा-भाईंदरमध्ये 106 ठाणे ग्रामीणमधील 49 रुग्णांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात मुंबई आणि उपनगरे तसेच पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि नागपूर या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. राज्यात रविवारी करोनाच्या 3,870 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 32 हजार 75 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत राज्यभरात 101 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा 6 हजार 170 झाला आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 591 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 65 हजार 744 रुग्ण बरे झाले असून, 60 हजार 147 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.