२ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल; मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ३० जणांवर कायदेशीर कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ५२६ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ३० इसमांविरुद्ध कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एकाचवेळी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ड्रंक अँड ड्राइव्हचे ४९, मोटार वाहन कायद्यानुसार इतर ३५६, फॅन्सी नंबर प्लेटचे १५, कलम १९४ बी अंतर्गत ३१, तीन सीट प्रवासाचे ४, विना परवाना वाहन चालविण्याचे १, कलम ६६/१९२ अंतर्गत ८ आणि विना हेल्मेट वाहन चालविण्याचे ६२ असे एकूण ५२६ केसेस दाखल करण्यात आल्या.
मद्यपान करून वाहन चालविणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी उड्डाणपूल व रस्त्यांवर विनाकारण वाहन उभे करू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अशोक नखाते तसेच चाळीसगाव, जळगाव, भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून करण्यात आली.








