एरंडोल तालुक्यातील तरुणाला गंडवले
जळगाव, ( प्रतिनिधी) : फसवणुकीच्या उद्देशाने मोबाईलवर एपीके फाइल पाठवून एका नागरिकाची तब्बल १० लाख ९७ हजार ३९३ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषिकेश नगराज पाटील (वय २२, धंदा- खाजगी सोलर व्यवसाय, रा. खैरनार गल्ली, कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) हे आहेत. फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत वेळोवेळी, अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर एक एपीके फाइल पाठवली होती. फिर्यादी यांनी ती फाइल क्लिक केली असता, त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी एकूण १० लाख ९७ हजार ३९३ रुपये काढून घेण्यात आले.
या प्रकरणी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर हे करीत आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या संशयास्पद फाइल्स किंवा लिंक्स ओपन न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.









