नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – डेहराडून, उत्तराखंडमध्ये भारत चीन सीमेलगत असणारा एक पूल सोमवारी कोसळला. अत्यंत अवजड सामुग्री घेऊन जाणारा ट्रक या पुलावर आल्यानंतर त्याच्या भाराने हा पुल पडला. या ट्रकच्या चालकासह दोनजण या अपघातात गंभीर जखमी झाले.
हा ट्रक पूल पार करून रस्त्यावर येण्याच्या स्थितीत असतानाच हा पूल कोसळला. त्यामुळे ट्रक दरीत पडला. त्यावेळी या ट्रकच्या मागे एक माणुस चालत येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
धपा मिलम रस्त्यावर बांधकाम साहित्य घेऊन हा ट्रक जात होता. मिलम येथे चीनच्या सीमेशेजारी सुरू असणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी हा ट्रक साहित्य घेऊन जात होता, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
या ट्रकमागून चालणाऱ्या व्यक्तीही दरीत कोसळला मात्र तो सुखरूप बचावला. स्थानिक नागरिकांनी मदत कार्य करत चालकासह अन्य एकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.







