सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पाच आरोपी अटकेत
बोदवड (प्रतिनिधी) :- फटाके फोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोन नातेवाइकांवर दगड, फरशीचे तुकडे तसेच लोखंडी पाइप आणि लोखंडी बोर्डाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बोदवड शहरातील गांधी चौक परिसरात घडली. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८.३० ते ९.३० वाजेच्या सुमारास बोदवड शहरातील गांधी चौक परिसरात असलेल्या अरिहंत ज्वेलर्ससमोर फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपींनी फिर्यादी संदीप जवरी मिलांदे (वय ३६, व्यवसाय नगरपंचायत कर्मचारी, रा. मेहतरवाडा, बोदवड) तसेच त्यांचे नातेवाईक प्रदीप मिलांदे आणि कुलदीप मिलांदे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी प्रदीप आणि कुलदीप यांना दगड व फरशीचे तुकडे डोक्यात मारून तसेच लोखंडी पाइप आणि लोखंडी बोर्डाने मारहाण केली. या हल्ल्यात दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तसेच, जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमावबंदी व इतर प्रतिबंधात्मक आदेशांची जाणीवपूर्वक अवहेलना केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी गोविंद गायकवाड, अजय गायकवाड, सोनू गंगाराम गायकवाड, अनिल चिंचोळे, उखा दिनेश मोरे, विकी गायकवाड व इतर इसमांविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद राळेभात करीत आहेत. बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष लव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.









