जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावले. नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित या स्पर्धेत एकूण ११ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. गोदावरी महाविद्यालयाच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ करत स्पर्धेत आपली छाप पाडली.


पहिल्या सामन्यात गुलाबराव देवकर महाविद्यालयाच्या उपांत्यपूर्व फेरीत एस.एस.बी.टी. महाविद्यालय, बांभोरीच्या संघावर सलग दोन सेटमध्ये मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.उपांत्य फेरीत एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय, धुळेच्या संघाला पराभूत करून गोदावरीच्या खेळाडूंनी दिमाखात अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात आर.सी.पी.आय.टी. महाविद्यालय, शिरपूरच्या बलाढ्य संघासोबत चुरशीची लढत झाली.
तीन सेटपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात गोदावरीच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. मात्र, अखेर २-१ सेटने पराभव स्वीकारावा लागला. या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव, सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापकवृंद यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डी.एम. कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनीही संघाचे कौतुक करत खेळाडूंच्या यशाचे अभिनंदन केले.








