जळगाव, (प्रतिनिधी) : आव्हानात्मक व्यावसायिक परिस्थितीतही जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे. सप्टेंबर २०२६ अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत १०.१ टक्क्यांनी वाढून १,५७६.७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा महसूल १,४३२.३ कोटी रुपये होता. सूक्ष्म सिंचन, कृषी प्रक्रिया आणि प्लास्टिक उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या जैन इरिगेशनने ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.


या तिमाहीत कंपनीचा एकत्रित एबिटडा (EBITDA) ४.२ टक्क्यांनी वाढून २०७.५ कोटी रुपये झाला असून एबिटडा मार्जिन १३.२ टक्के राहिले आहे. तसेच, एकत्रित निव्वळ नफ्यात १७.४ टक्क्यांची वाढ होऊन तो १८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न ३.६ टक्क्यांनी वाढून ३,०८५ कोटी रुपये झाले, तर स्वतंत्र पातळीवरील एकूण उत्पन्न १,४२४.४ कोटी रुपये नोंदवले गेले. कंपनीच्या या कामगिरीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले, “आव्हानात्मक व्यावसायिक परिस्थिती असतानाही चालू आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही कंपनीसाठी चांगली ठरली आहे. कृषी प्रक्रिया आणि परदेशातील प्लास्टिक व्यवसायाने सातत्याने चांगली वाढ नोंदवली आहे. विशेषतः थकीत येण्यांच्या वसुलीत झालेल्या लक्षणीय सुधारणेमुळे कंपनीचा रोख प्रवाह अधिक मजबूत झाला आहे. स्वतंत्र पातळीवरील व्यवसायातून निर्माण झालेला परिचालन रोख प्रवाह हा एबिटडाच्या १८० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कंपनीला कर्जरोखे यांची निर्धारित वेळेत परतफेड करणे शक्य झाले आहे. आगामी काळातही थकीत रकमेची वसुली वाढविणे आणि रोख प्रवाह अधिक सक्षम करणे यावर आमचा भर राहणार आहे.”
व्यावसायिक परिस्थितीबाबत बोलताना जैन यांनी सांगितले की, देशातील काही भागांमध्ये प्रतिकूल हवामान आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सूक्ष्म सिंचन प्रणाली तसेच कृषी पाईप्सच्या मागणीवर काही प्रमाणात परिणाम झाला. त्याचबरोबर पश्चिम आशियातील घडामोडींमुळे पॉलिमरच्या किमती आणि मालवाहतूक खर्चात वाढ झाली. मात्र, बाजारातील परिस्थितीनुसार वेळेवर किमतींमध्ये आवश्यक बदल आणि प्रभावी पुरवठा साखळी व्यवस्थापनाच्या माध्यमातून कंपनीने या आव्हानांचा सामना केला. यापूर्वी काही प्रमाणात कमी झालेल्या पॉलिमरच्या किमती पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे दुसऱ्या तिमाहीत पुन्हा वाढल्या. तथापि, सस्पेन्शन-ग्रेड पीव्हीसी रेझिनसाठी लागू करण्यात आलेले किमान आयात मूल्य (MIP) आणि सीमाशुल्क सवलत मागे घेण्यासारख्या धोरणात्मक उपाययोजनांमुळे किमतींमधील चढ-उतार कमी होण्यास मदत झाली आहे.
कंपनीच्या आगामी वाटचालीबाबत अनिल जैन यांनी विश्वास व्यक्त केला की, कृषी प्रक्रिया आणि परदेशातील व्यवसायाची चांगली कामगिरी कायम राहण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर देशांतर्गत हाय-टेक अॅग्री आणि पाईपिंग व्यवसायातील मागणी पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कंपनीच्या परिचालन कार्यक्षमतेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. व्यवसायातील वाढ, थकीत रकमेची प्रभावी वसुली आणि मजबूत रोख प्रवाह यांच्या बळावर कंपनीची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यावर व्यवस्थापनाचा भर राहणार आहे.








