जळगावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; २२२ गुन्हे दाखल


४४.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त; १८७ आरोपींवर कारवाई
जळगाव, प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, मद्यनिर्मिती आणि हातभट्टी दारूच्या व्यवसायाविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑक्टोबर महिन्यात विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान एकूण २२२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १८७ आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ४४ लाख ८१ हजार ८७३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध मद्यवाहतूक व विक्रीसाठी वापरण्यात येणारी आठ वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.

विविध प्रकारच्या मद्यसाठ्यावर कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑक्टोबर २०२६ मध्ये केलेल्या कारवाईत ३ हजार ८५६ लिटर हातभट्टी दारू, २८४ लिटर देशी दारू, २३८ लिटर ताडी, १८ लिटर विदेशी दारू आणि ४९ लिटर बिअर जप्त केली. याशिवाय अवैध हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ८५ हजार ३४५ लिटर कच्चे रसायन (वॉश) घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
अवैध मद्यविक्रीविरोधात मोहीम तीव्र
जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, निर्मिती आणि तस्करीला आळा घालण्यासाठी आगामी काळातही विशेष मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव यांच्याकडून देण्यात आला आहे.








