जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; ५ गुन्हे दाखल


७ जणांवर कारवाई; ५०.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, ३ डंपर व २ ट्रॅक्टर ताब्यात
जळगाव, प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ४ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी छापे टाकून पाच गुन्हे दाखल केले. या कारवाईत सात जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, तीन डंपर, दोन ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण ५० लाख ९० हजार २६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेला अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
भडगावात सर्वाधिक मुद्देमाल जप्त
भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलवाडी बुद्रुक येथे कारवाई करून १२ ब्रास वाळू आणि दोन डंपर असा एकूण ४१ लाख ३१ हजार ५६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबादमध्ये डंपर पकडला
नशिराबाद पोलिसांनी तरसोद फाट्याजवळील महामार्गावरील पुलावर कारवाई करत तीन ब्रास वाळू आणि एक डंपर जप्त केला. या मुद्देमालाची किंमत तीन लाख १० हजार रुपये असून, याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुफनगरी ते खेडी खुर्द मार्गावर तीन कारवाया
जळगाव तालुका पोलिसांनी फुफनगरी गावाच्या नदीपात्रातून खेडी खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवायांमध्ये तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. एका प्रकरणात एक ब्रास वाळू आणि ट्रॅक्टर असा दोन लाख २४ हजार २३० रुपयांचा, दुसऱ्या प्रकरणात तीन ते चार घमेले वाळू आणि ट्रॅक्टर असा दोन लाख रुपयांचा, तर तिसऱ्या प्रकरणात एक ब्रास वाळू आणि ट्रॅक्टर असा दोन लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्यासह संबंधित पोलीस पथकांनी कारवाईत सहभाग घेतला.
जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.








