यावलमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या

पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा; आरोपीला अटक
जळगाव, प्रतिनिधी : चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीला भिंतीवर ढकलून दोन्ही हातांनी गळा दाबून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना यावल शहरातील गणपतीनगर परिसरात घडली. मसीराबी फरदीन खान (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी पती फरदीन खान आरीफ खान याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास यावल शहरातील आयशानगर परिसरातील गणपतीनगर येथे मसीराबी आणि तिचा पती फरदीन खान हे दोघे घरात एकटे होते. त्यावेळी दोघांमध्ये एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेण्यावरून वाद झाला.
या वादादरम्यान मसीराबी हिने पतीच्या कानशिलात मारली. त्यामुळे संतप्त झालेल्या फरदीनने तिला बेडरूममधील भिंतीवर ढकलले आणि दोन्ही हातांनी तिचा गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला.
मृत मसीराबी हिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा क्रमांक ३९६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ३ नोव्हेंबर रोजी रात्री ७.१५ वाजता आरोपी पतीला अटक केली. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद करीत आहेत.









