मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची भडगाव तालुक्यात क्षेत्रीय भेट; जलतारा उपक्रमाचे उद्घाटन आणि सोजत गोट फार्मची पाहणी
जलसंधारण आणि पशुसंवर्धनाच्या उपक्रमांना प्रोत्साहन; चारा उपलब्धतेचाही घेतला आढावा
जळगाव, दि. ३ नोव्हेंबर २०२६ : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर यांनी मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी भडगाव तालुक्यातील क्षेत्रीय भेटीदरम्यान जुवार्डी गावात जलतारा उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी जलतारा योजनेचे संस्थापक श्री.वायाळ यांच्या उपस्थितीत जलसंधारणाच्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
जलसंधारण, भूजल पातळी वाढविणे आणि पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जलतारा उपक्रम महत्त्वपूर्ण असून, ग्रामस्थांच्या लोकसहभागातून अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जुवार्डी गावचे पी. ए. पाटील व रोजगार सेवक भूषण पाटील यांनी केले होते. याप्रसंगी पंचायत समिती भडगावचे गटविकास अधिकारी श्री. के. बी. अंजने, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत गुढे येथे उभारण्यात आलेल्या ५००+२५ सोजत गोट फार्मला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच प्रक्षेत्रावर करण्यात आलेली चारा पिकांची लागवड आणि उत्पादनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तालुक्यातील चारा उपलब्धतेबाबतही आढावा घेतला. सद्यस्थितीत तालुक्यात पुरेसा चारा उपलब्ध असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, चारा साक्षरता अभियान तसेच रब्बी हंगामातील वैरण बियाणे वाटपाबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी VB-G-RAMG योजनेंतर्गत चारा लागवडीसाठी मका, ज्वारी व बाजरी या वैरण बियाण्यांचा समावेश करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
या क्षेत्रीय भेटीदरम्यान डॉ. संदीप निकम, सहाय्यक आयुक्त, डॉ. विशाखा कापसे, पशुवैद्यकीय अधिकारी, गुढे तसेच डॉ. विशाल गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी, अमडदे उपस्थित होते.
जलसंधारण, लोकसहभागातून ग्रामविकास आणि पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील आहे.









