शाहूनगर परिसरातील घटना; इलेक्ट्रिक फिटिंगसाठी आणलेली महागडी वायर चोरट्यांनी केली लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील शाहूनगर भागात फिर्यादी यांच्या मालकीचे प्लॉट क्रमांक २२ येथे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी इलेक्ट्रिक फिटिंगचे साहित्य आणून ठेवण्यात आले होते. मात्र, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजेपासून ते २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बांधकामाच्या ठिकाणी प्रवेश केला.
चोरट्यांनी तेथे ठेवलेली KEI कंपनीची विविध आकारांची कॉपर वायर चोरून नेली. यामध्ये २.५ एमएम, ६ एमएम, १.५ एमएम तसेच इतर आकारांच्या कॉपर वायरच्या बंडलचा समावेश आहे. चोरी झालेल्या साहित्याची एकूण किंमत अंदाजे ७० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चेतन निंबा चव्हाण (वय २९, रा. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.३५ वाजता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









