रावेरमध्ये २० हजारांची लाच घेताना वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, प्रतिनिधी : रावेर वन परिक्षेत्रात जेसीबीच्या साहाय्याने गाळ काढल्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनरक्षक जगदीश काशिनाथ जगदाळे (वय २६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा कारवाईत पकडले. २८ ऑक्टोबर रोजी रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील साईनाथ ज्यूस सेंटर परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०६/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीश काशिनाथ जगदाळे हा रावेर येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावचे पोलीस निरीक्षक हेमंत खंडू नागरे यांनी फिर्याद दिली आहे.
जेसीबीच्या कामासाठी २० हजारांची मागणी
एसीबीकडे दाखल तक्रारीनुसार, तक्रारदाराने संबंधित वनक्षेत्रातून जेसीबीच्या साहाय्याने गाळ काढला होता. या कामाच्या मोबदल्यात वनरक्षकाने २० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच साईराम राठोड यांच्या ट्रॅक्टरद्वारे गाळाची वाहतूक केल्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपये मागितल्याचेही तक्रारीत नमूद आहे. अशा प्रकारे एकूण ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दूरध्वनीवरील संपर्कानंतर सापळा
२७ ऑक्टोबर रोजी वनरक्षकाने तक्रारदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी भेटण्यासाठी बोलावण्यात आले. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर साईनाथ ज्यूस सेंटर परिसरात सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान २० हजार रुपये स्वीकारताना वनरक्षकाला पकडण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक स्मित दत्तात्रय नवपरे करीत आहेत.









