जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धुळे जिल्ह्यात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील सुमारे दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले. अजय भाईदास थोरात (वय २७, रा. नवलनगर, ता. जि. धुळे) आणि संभाजी बाळू पाटील (वय २६, रा. सातरने, ता. जि. धुळे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी धरणगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांमधील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष पथके तयार करून प्रभावी मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यातील फरार आरोपींची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या होत्या. या मोहिमेदरम्यान २१ ऑक्टोबर २०२६ रोजी पथकातील अधिकारी व अंमलदारांना एका विश्वासार्ह बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली. धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६०/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०९ (४) व ३ (५) अंतर्गत दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी धुळे जिल्ह्यात असल्याची माहिती पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तातडीने धुळे जिल्ह्यात रवाना झाले. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना धरणगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, चोपडा उपविभाग, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिलाल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलेश सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल विलास गायकवाड आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी यांचा समावेश होता.
जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत असून, या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला यश मिळाले आहे.









