नवी दिल्ली (वृत्त संस्था) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी हे वास्तवात सरेंडर मोदी असल्याची टिप्पणी त्यांनी पंतप्रधानांवर केली आहे. एका ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

लखाडमधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या हल्ल्यात वीस भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर हौतात्म्याच्या मुद्यावरून राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. आज नव्याने ट्विट करत त्यांनी पंतप्रधानांना सरेंडर मोदी असे म्हटले आहे. राहुल गांधी जपान यांनी जपान टाईम्समधील एक लेख शेअर करत ही टीप्पणी केली आहे. जपान टाईम्सने भारताचे विद्यमान धोरण हे चीनचे तुष्टीकरण करणारे असल्याचे म्हटले आहे.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर दिलेल्या त्यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले होते. आमच्या सीमेतही कुणी घुसखोरी केलेली नसून आमची चौकीही कुणी ताब्यात घेतलेली नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. लखाडमध्ये आमचे वीस शूर जवान शहीद झाले, मात्र ज्यांनी भारत मातेकडे डोळे वर करून पाहीले, त्यांना त्यांनी धडा शिकवला असल्याचेही मोदी म्हणाले होते.
पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ज्या ठिकाणी भारतीय जवान शहीद झाले ते ठिकाण, भूमी जर चीनची होती, तर मग आमच्या सैनिकांना का मारले गेले. त्यांना कोठे मारले गेले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. गलवान खोऱ्यात भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेससह इतर अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस जवानांच्या हौतात्म्यावरून सतत मोदी सरकारला प्रश्न विचारत आहे. तर आता वायएसआर काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) सारखे पक्ष पंतप्रधान मोदींच्य समर्थनार्थ पुढे आले आहेत.







