बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेवर अत्याचार केल्याचा तसेच तिचे चित्रीकरण करून धमकावल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी तीन आरोपी आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.


पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला घरी एकटी असताना आरोपींनी घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यानंतर महिलेला मारहाण करून धमकावल्याचे, तसेच तिचे आक्षेपार्ह चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तसेच, आरोपींनी महिलेला धमकावून तिच्यावर दबाव निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित आरोपींनी संगनमताने कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचे तपास अधिकारी सपोनि शत्रुघ्न पाटील असून, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. उपलब्ध पोलीस नोंदीनुसार, गुन्हा दाखल झाला आहे.









