फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची फिर्याद; भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भडगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेसोबत फोटो काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच मार्च २०२६ मध्ये भडगाव तालुक्यातील बाळद रोड परिसरातील शेतातील एका पत्र्याच्या घरात पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची आणि याबाबत कोणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची फिर्याद आहे.
या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या नोंदीनुसार, आरोपीचे नाव दुर्गेश पाटील (वय १९,भडगाव ) असे आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
टीप : हे वृत्त पोलिसांच्या प्राथमिक नोंदीतील तक्रारीवर आधारित आहे. आरोप सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष मानला जातो. अल्पवयीन पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.









