विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या ५ जणांवर एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल
एरंडोल ( प्रतिनिधी ) –घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख रुपये आणण्याच्या कारणावरून विवाहितेचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. रेखा देवीदास साळवे (वय ३१, रा. एम.डी.एस. कॉलनी, रूपसदन बंगल्याजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव; सध्या रा. जहाँगीरपुरा, मरीमाता मंदिराशेजारी, एरंडोल) या सासरी नांदत असताना हा छळ सुरू होता.
पतीला घर बांधण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी त्यांचे पती देवीदास खुशाल साळवे, सासू शकुंतला खुशाल साळवे, दीर शरद खुशाल साळवे, नंदोई शरद सपकाळे आणि नणंद वैशाली शरद सपकाळे (सर्व रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी संगनमत करून त्यांना सातत्याने शिवीगाळ व मारहाण केली. तसेच पैशांसाठी त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करून त्यांना घराबाहेर काढले.
या छळाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेने एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. फिर्यादीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या पाचही जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८(अ) व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील हंसराज पवार यांनी भेट दिली असून पोलीस नाईक दत्तात्रय ठाकरे (ब.नं. ७३४) या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.