लोखंडी रॉड व धारदार चाकूने वार करून तरुणाला गंभीर जखमी केल्याचा आरोप; तिघांना अटक
वरणगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सिद्धेश्वरनगर परिसरात प्रेमविवाहाच्या कारणावरून एका तरुणाच्या भावावर लोखंडी रॉड आणि धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता घडली. या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची तक्रार असून, त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींबाबत पुढील तपास सुरू आहे.


प्रेमविवाहाच्या कारणावरून वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ संजय माळी (वय २४, व्यवसाय मजुरी, रा. सिद्धेश्वरनगर, वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांच्या प्रेमविवाहाच्या कारणावरून संबंधित आरोपींमध्ये वाद निर्माण झाला होता. याच कारणातून १२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास वरणगावातील सिद्धेश्वरनगर परिसरात आरोपींनी एकत्र येत गोपाळ माळी यांच्या भावावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या वेळी आरोपींनी लोखंडी रॉड आणि धारदार चाकूचा वापर करून तरुणाला गंभीर दुखापत केली. तसेच त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी सोपान पंडित धनगर, पवन संजय धनगर, धीरज संजय धनगर, निर्मलाबाई बापू धनगर, मिराबाई संजय धनगर, सागर बापू धनगर, मयूर भागवत धनगर आणि निलेश राखुंडे (सर्व रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), १८९(२), १८९(४), १९०, ११८(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तिघांना अटक; पुढील तपास सुरू
या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचे नेमके स्वरूप, हल्ल्यातील प्रत्येकाची भूमिका आणि इतर आरोपींचा सहभाग याबाबत पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार प्रतापसिंग बागुल करीत आहेत. प्रेमविवाहाच्या कारणावरून झालेल्या या कथित हल्ल्यामुळे वरणगाव परिसरात चर्चेला उधाण आले आहे.









