शेतजमिनीच्या व्यवहारात फसवणुकीचा डाव; चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल, तीन आरोपी अटकेत
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्याच्या नावावरील शेतजमीन विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार चाळीसगाव येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दिलीपराव देशमुख (वय २९, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादी शुभम देशमुख यांच्या नावाने बनावट पॅनकार्ड आणि मतदार ओळखपत्र तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडे शिवारातील भूमापन क्रमांक २२६/३ मधील २ हेक्टर ८० आर शेतजमीन सोमनाथ केदार (रा. कळमडू, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांना विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा तक्रारीत आरोप आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२), ३१८(४), ३३५, ३३६, ३४०, ६१ तसेच ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात नाकुल राजू खरात (रा. पंचशील नगर, चाळीसगाव) आणि प्रशांत रमेश निकम (रा. हिरापूर रोड, सुयश लॉन्सच्या पाठीमागे, चाळीसगाव) यांच्यासह अन्य एका आरोपीचा समावेश असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहार करण्याच्या या प्रकारामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.









