सागर पार्क मैदान, लाठी विद्यालयात अधिकाऱ्यांसोबत घेतला आढावा



जळगाव ( प्रतिनिधी ) –आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक विसर्जन आणि निर्माल्य संकलनासाठी विशेष तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी सागर पार्क मैदान आणि लाठी विद्यालय (ईश्वर कॉलनी परिसर) या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान महापौरांनी कृत्रिम तलाव निर्मिती आणि निर्माल्य संकलनाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली व विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या.
यावेळी महापालिका उपायुक्त निर्मला गायकवाड, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील, आर. टी. पाटील यांच्यासह संबंधित कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी विविध सूचना केल्या. कृत्रिम तलाव परिसर रांगोळी आणि फुलांनी सजवून आकर्षक करावा. विसर्जन स्थळी नागरिकांच्या सोयीसाठी पुरेसे कर्मचारी व मनुष्यबळ तैनात ठेवावे. महापालिकेचे अधिकृत बॅनर लावावेत तसेच निर्माल्य संकलनासाठी कलश व डबे ठेवावेत.
नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेतर्फे सागर पार्क मैदान आणि लाठी शाळा (ईश्वर कॉलनी परिसर) या दोन मुख्य ठिकाणी घरगुती श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र व कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना या ठिकाणी विसर्जनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. ज्यांना दूरच्या ठिकाणी जाणे शक्य नाही, त्यांनी जवळच्या या केंद्रांचा लाभ घ्यावा, असे नियोजन करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणच्या व्यवस्थेची पाहणी महापौर व उपायुक्तांनी केली.
नागरिकांना महापौरांचे विशेष आवाहन
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील श्री गणेश मूर्तींचे विसर्जन महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावातच करावे. तसेच देवाला वाहिलेले निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये न आणता, कागद किंवा वर्तमानपत्रात गुंडाळून आणावे आणि पालिकेच्या निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे.








