गर्दीचा फायदा घेत १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल
जामनेर (प्रतिनिधी) :- जामनेर बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे मणी लंपास केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली संजय पाटील (वय ४०, व्यवसाय शेती, रा. पाळधी, ता. जामनेर) या १३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जामनेर बसस्थानक येथे सार्वजनिक ठिकाणी होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, त्यामध्ये २ ग्रॅम वजनाचे दोन वाटे तसेच १ ग्रॅम वजनाचे चार सोन्याचे मणी असा एकूण सुमारे १५ हजार रुपये किमतीचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर वैशाली पाटील यांनी जामनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर ४५४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना ५८ रविंद्र देशमुख हे करीत आहेत. अज्ञात आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही.









