नवी दिल्ली (वृत्तासंस्था) – भारत आणि चीन यांच्यातील सध्याच्या वातावरणावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यात आता काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीदेशील उडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर एक वक्तव्य केलं. ते असं म्हणाले की भारतात कोणत्याही प्रकारची घुसखोरी चीनकडून झालेली नाही. मग ५ आणि ६ मे रोजी जे झालं ते काय होतं? १६ आणि १७ जूनला काय झालं? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली आहे का? असा सवाल पी. चिदंबरम यांनी विचारला आहे.

जर घुसखोरी झालीच नाही असं पंतप्रधान म्हणत आहेत तर मग भारताचे २० जवान शहीद कसे झाले? गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि चीन या दोन देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष कसा झाला? चकमकी कशा घडल्या ? हे प्रश्नही चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत. सोमवारी गलवानमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. चिनी सैनिकांनी धोका देऊन केलेल्या हल्ल्यात ही घटना घडली. त्यानंतर चीनविरोधात देशभरात संताप व्यक्त होतो आहे. अशात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
या बैठकीत सुमारे २० पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत शरद पवार, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासारख्या दिग्गजांनी मोदींना काही सल्ले दिले, सूचनाही दिल्या. तसंच देश एकजूट रहावा यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत अशीही ग्वाही दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर केलेल्या भाषणात भारतात घुसखोरी झालेली नाही असं म्हटलं होतं. यावरुनच माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.







