कोल्हार(वृत्तसंस्था) -राजुरी रोडवरील प्रवरा डावा कालव्या जवळून मोटारसायकल वरून जाताना कालव्याचा अंदाज न आल्यामुळे गाडीसह तीन जण कालव्यात पडले. यातील एक जणांचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाले आहेत. सदर घटना बुधवारी पहाटे घडली. शुभम बाळासाहेब लांडे (रा. खंडाळा) हा घटनेत मृत्युमुखी पडला. प्रवीण भाऊसाहेब त्रिभुवन (रा. खंडाळा) व जयंत शशिकांत विधाते (रा. रांजणखोल) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक व प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हार-राजुरी रोडवरील राजुरी गावाजवळ असणाऱ्या प्रवरा डावा कालव्या लगत भालेराव वस्ती आहे. जवळ असणाऱ्या हेड लगत कोल्हार गावाकडून मोटारसायकल वरून येणाऱ्या तीन तरुणांना प्रवरा डावा कालव्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे हे तिघेही गाडीसह पाण्यात पडले. यानंतर दोन जण जखमी अवस्थेत कसेबसे बाहेर निघाले. त्यांनी आपल्या तिसऱ्या जोडीदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रवरा डावा कालव्याला पाणी असल्यामुळे त्यांना तो नजरेस पडला नाही. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.बुधवारी सकाळी तिसऱ्या व्यक्तीचा शोध नागरिकांनी घेतला. भालेराव वस्ती जवळील असणाऱ्या हेडप जवळच मयत शुभम लांडे नावाच्या युवकाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह लोणी पोलीस व नागरिकांनी बाहेर काढून प्रवरा हॉस्पिटलला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. लोणी पोलीस स्टेशनला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि प्रकाश पाटील करीत आहेत.