पाचोरा ;- ऑनलाइन शिक्षण एक पर्याय मानला जात असला तरी त्या पर्यायाला प्रत्येक विद्यार्थ्यासाठी परिपूर्ण पर्याय म्हणता येणार नाही.मोठ्या शाळांसह प्रत्येक शाळेने आपापल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण,अभ्यासक्रम आणि परीक्षा पोहोचवण्याचा प्रयत्न केला असला तरी ऑनलाइन शिक्षण समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले किंवा पोहोचू शकेल हा दावा करणे पूर्णतः अनुचित ठरेल.काही सीबीएससी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून किंवा नामांकित मराठी माध्यमांच्या शाळांमधून देखील ऑनलाइन शिक्षण झूम किंवा गूगल ॲपच्या माध्यमातून सुरू झाले असले तरीदेखील तळागाळातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल असे मत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था चेअरमन संजय ओंकार वाघ यांनी व्यक्त केले .
त्यांनी म्हटले आहे कि , सीबीएससी ,इंग्रजी किंवा मोठ्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये जाणारा उच्चशिक्षित, उच्चभ्रू आणि श्रीमंत परिवारातील विद्यार्थ्यांना या माध्यमांशी जोडणारे साधन सहज उपलब्ध होत आहे तर आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी चक्क लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर खरेदी करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या रांगेत उभा करणारा जागृत पालक या शाळांमध्ये असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया एप्रिल पासूनच सुरू झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमांच्या लहान शाळांसाठी प्रत्यक्ष शिक्षण शिक्षकांमार्फत ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे म्हणजे मोठे आव्हान ठरत आहे. मराठी माध्यमांच्या शाळांनी देखील विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले असले तरी ग्रामीण भागातील तळागाळातील कुटुंबापर्यंत आणि दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण प्रत्यक्ष पोहोचवणे सध्या तरी कठीण आहे.अनेक कुटुंब असे आहेत की ज्या कुटुंबामध्ये लॅपटॉप किंवा कम्प्युटर साधने तर दूर अँड्रॉइड मोबाईल देखील दिवास्वप्न आहे. म्हणूनच उच्चशिक्षित आणि उच्चमध्यमवर्गीय कुटुंबासाठी ऑनलाइन शिक्षण सुरु झाले असले तरी गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना मात्र सध्यातरी केवळ शाळांकडून जळगाव डाएटच्या सूचनांनुसार रोज आनंददायी प्रश्नोत्तरे पाठवून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी ग्रामीण भागात त्या ऑनलाईन येणाऱ्या अभ्यासापेक्षा विद्यार्थ्याला शेतावर कामाला पाठवून आर्थिक मिळकत वाढवण्याचा प्रयत्न पालकांकडून केला जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण कठीणच वाट म्हणावी लागेल. आज जवळपास 80 टक्के विद्यार्थी हे मराठी माध्यमांच्या शाळातून शिक्षण घेत आहेत आणि त्यातील जवळपास साठ टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत.अनेक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना तर पोहोचलेलीसुद्धा नाही हे विदारक सत्य आहे.अनेकांकडे अँड्रॉइड किंवा स्मार्टफोन उपलब्ध नाहीत.दारिद्र्यरेषेखाली जगणारे विद्यार्थीदेखील आज अनेक गाव आणि शहरांमध्ये आहेत. या शिवाय प्रत्येक कुटुंबात केवळ एकच विद्यार्थी शाळेत असेल असे नव्हे जर एकाच कुटुंबात दोन विद्यार्थी असतील तर दोन्ही ही विद्यार्थ्यांसाठी त्या कुटुंबाकडे एकाच वेळी दोन अँड्रॉइड मोबाइल किंवा कम्प्युटर यासारखे साधने उपलब्ध आहेत का किंवा नेट कनेक्शनसाठी त्या कुटुंबाकडे आर्थिक पाठबळ आहे का यांचा देखील विचार होऊ नये इतकेच गरजेचे आहे. याशिवाय मोबाईल,लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या सततच्या उपयोगामुळे बालकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो हे विसरून चालणार नाही.बालकांची एकाग्रता आणि आकलन क्षमता लक्षात घेता दीर्घकाळ या साधनांच्या उपयोगामुळे बालकांचे मानसिक स्वास्थ्य तर खराब होऊ शकतेच परंतु या साधनांच्या सततच्या उपयोगामुळे डोळ्यांवर देखील विपरीत परिणाम होणे संभाव्य आहे. बालकांमध्ये सोबतच चिडचिड आणि नकारात्मक मानसिकता देखील निर्माण होऊ शकते हे विसरून चालणार नाही.म्हणूनच सद्यस्थितीत अल्पावधीसाठी ऑनलाईन शिक्षण एक पर्याय असला तरी तो परिपूर्ण आहे असे म्हणताच येऊ शकत नाही हेही तेवढेच खरे!








