चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल ९.३४ लाखांचा गांजा जप्त, तस्कराला अटक


चाळीसगाव: शहरातील चामुंडा माता मंदिराच्या मागे, डोंगरी नदीच्या कडेला असलेल्या एका घरात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी साठवलेला तब्बल ९ लाख ३४ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा चाळीसगाव शहर पोलिसांनी जप्त केला आहे. २५ ऑगस्टच्या रात्री मारलेल्या या छाप्यात पोलिसांनी १८ किलो ६८६ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ जप्त करून एका संशयित तस्कराला रंगेहात अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भूषण केशव पवार (वय ४५, रा. चामुंडा माता मंदिराजवळ, डोंगरी नदीच्या बाजूला, चाळीसगाव) याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राहत्या घरात गांजाची मोठी साठवणूक केली होती. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दिलीप शिवाजी राक्षे (वय ३७) यांना याबाबत गुप्त बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी २५ ऑगस्ट रोजी रात्री १०.१० वाजेच्या सुमारास संशयिताच्या घरावर छापा टाकला.
या छाप्यात आरोपीच्या ताब्यातून दोन वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरलेला गांजा आढळून आला. यात २,७०,०५०/- रुपये किमतीचा ५ किलो ४०१ ग्रॅम गांजा एका प्लास्टिक पिशवीत, तर ६,६४,२५०/- रुपये किमतीचा १३ किलो २८५ ग्रॅम गांजा पांढऱ्या गोणीत साठवलेला होता. पोलिसांनी हा एकूण ९,३४,३००/- रुपये किमतीचा १८ किलो ६८६ ग्रॅम मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी पहाटे ०१.२५ वाजता एन.डी.पी.एस. (NDPS) अधिनियम १९८५ चे कलम ८(C) व २०(B)(ii)(B) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ४०२/२०२६) दाखल करण्यात आला असून आरोपी भूषण पवार याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.









