नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – चीनकडून अक्साई चीन परत घेण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांनी केले आहे. 2020 मध्ये जे सरकार केंद्रात आहे ते 1962 चे सरकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे म्हटले होते. पंतप्रधानांनी पुन्हा तेच म्हटले आहे. आता कोणती पावले उचलायची आहेत हे यापूर्वीच सरकारने ठरवले आहे, असेही नामग्याल म्हणाले.

गलवान खोर्यात शहीद झालेल्या भारताच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूतीही व्यक्त केली. जमयांग नामग्याल यांनी संपूर्ण घटनेवर भाष्य केले आहे. भारत चीन सीमेवर जी परिस्थितीत आहे त्याची संपूर्ण देशाला कल्पना आहे. लडाखच्या नागरिकांच्या भावना पाहून ते आपल्या जवानांसोबत उभे असल्याचे मी सांगू शकतो. केंद्र सरकार जो कोणता निर्णय घेईल, लडाख त्यांच्या सोबत असेल, असे जमयांग नामग्याल म्हणाले.
भारत चीन सीमेवरील तोडगा केवळ लडाखलाच नाही तर संपूर्ण देशाला हवा आहे. सीमेवर देशाचं रक्षण करणार्या कोणत्याही जवानाला काही होऊ नये अशी आमची आशा आहे. लडाखमध्ये राहणार्या लोकांच्याही जिवनावर कोणता परिणाम होऊ नये. चीनने एकदाच नाही तर अनेकदा भारताचा विश्वासघात केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.







