शिक्षणावरून टोमणे; पत्नीच्या गळ्याला उपरण्याचा फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न
कासोदा : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला शिक्षण आणि कमाईवरून टोमणे मारत क्रूर वागणूक दिल्याची धक्कादायक घटना कासोदा येथे घडली. पतीने पत्नीच्या गळ्याला कापडी उपरण्याने फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, याप्रकरणी कासोदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.


शिक्षण आणि कमाईवरून टोमणे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कासोदा येथील राहत्या घरात पती-पत्नी बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी निलेश भगवान पाटील याने पत्नीला तिच्या शिक्षणावरून तसेच ती कमाई करत नसल्याच्या कारणावरून टोमणे मारले.
रडत असताना गळ्याला फास
यातून पत्नीला रडू आल्याने आरोपीने डोळे पुसण्याच्या बहाण्याने पांढऱ्या रंगाच्या कापडी उपरण्याने तिच्या गळ्याला फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे पत्नीला गंभीर मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
धुळे येथे उपचार सुरू
घटनेनंतर पीडित महिलेवर धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. तेथून प्राप्त झालेल्या जबाबाच्या कागदपत्रांच्या आधारे १६ ऑगस्ट रोजी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीला अटक
या प्रकरणी कासोदा पोलिसांनी CCTNS गु.र.नं. १२३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१) आणि ८५ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी निलेश भगवान पाटील याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास कासोदा पोलीस करीत आहेत.








