जळगाव – सांगलीचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अभिजित राऊत यांची जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली असून त्यांनी आज रात्री 8 वाजेच्या सुमारास पदभार स्वीकारला .

जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे मावळते जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी करण्यात आली होती . तसेच सांगली येथे कार्यरत असताना अभिजित राऊत यांनी ‘सांगली पॅटर्न ‘ राबवून कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात हातभार लावला होता . तसाच पॅटर्न ते आता जळगावात राबवून प्रशासनावरची पकड आणखी मजबूत करून कोरोनावर नियंत्रण आणण्याची त्यांची जबाबदारी पाडणार असल्याची अपेक्षा आता जळगावकरांनी व्यक्त केली .
कोरोना प्रादुर्भावाची सुरुवात असताना तो पुढे वाढू नये म्हणून रोखण्याची अभिजित राऊत यांची कामगिरी सांगली जिल्ह्यात यशस्वी ठरली असे म्हटले जात असले तरी जळगाव जिल्ह्यात मात्र भयावह उलटी परिस्थिती आहे . त्यामुळे या जिल्ह्यातील वस्तुस्थिती मुळापासून समजून घेऊन जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून अभिजित राऊत यांना कामाची सुरुवात करावी लागणार आहे. येथे अभिजित राऊत नवीन असल्याने सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेण्यापासून काम सुरु करावे लागणार आहे . पुढच्या टप्प्यात कठीण प्रसंगात धैर्याने काम करणारे सहकारी निवडावे लागणार आहेत . त्याचवेळी आधीच्या काळातील बऱ्या वाईट अनुभवांमुळे व प्रसंगांमुळे प्रक्षुब्ध झालेले जनमत हाताळावे लागणार आहे . सामान्य माणसाला प्रशासन आपल्यासाठी काम करत असल्याची खात्री पटकन दयावी लागणार आहे.







