जेसीबी कंपनीच्या दोन बॅटऱ्यांची चोरी; रावेर पोलिसांत गुन्हा दाखल

रावेर: रावेर तालुक्यातील पिंपरी शिवारातील वनतळ्यावर उभ्या असलेल्या पोकलेन मशीनमधून अज्ञात चोरट्याने जेसीबी कंपनीच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पाल (ता. रावेर, जि. जळगाव) येथील रहिवासी गणेश मानसिंग पवार (वय ३४, व्यवसाय- कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट मालक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली.
अज्ञात चोरट्याने पिंपरी शिवारातील वनतळ्यावर असलेल्या पोकलेन मशीनमधून प्रत्येकी २ हजार रुपये किमतीच्या जेसीबी कंपनीच्या दोन बॅटऱ्या (एकूण किंमत ४ हजार रुपये) फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेल्या. या प्रकरणी २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.५३ वाजता रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ५८८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार योगेश महाजन करत आहेत.









