
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील खेडी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या प्रीतम संभाजी पाटील (वय ३५, रा. खेडी, ता. जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १५ जुलै रोजी रात्री ते पायी घराकडे जात असताना मागून आलेल्या वाळूच्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर पडले असता डंपर त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.


घटनेनंतर प्रीतम पाटील यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे खेडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज घुले करीत आहेत.










