
रामानंद नगर पोलिसांची तांत्रिक माहितीच्या आधारे कारवाई; चोरीच्या पाच बॅटऱ्या जप्त
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पिंप्राळा-हुडको परिसरात एकाच रात्री पाच वाहनांमधील बॅटऱ्या चोरी करणाऱ्या संशयिताला रामानंद नगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. या कारवाईत संशयिताच्या ताब्यातून चोरीच्या पाच बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.


पिंप्राळा-हुडको परिसरातील रिक्षाचालक फिरोज खान युसूफ खान यांच्या रिक्षातील बॅटरी १४ जुलैच्या रात्री चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर परिसरात चौकशी केली असता समशेख खान कमर खान, वाहन अली शेख उस्मान, शेख सलीम शेख अमीर आणि मोईन शकील मलक यांच्या वाहनांमधील बॅटऱ्याही त्याच रात्री चोरी झाल्याचे समोर आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना तांत्रिक माहितीच्या आधारे जुबेर शेख जाबीर (रा. पिंप्राळा, हुडको) याच्यावर संशय आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे तसेच पोलीस अंमलदार सुधाकर आंभोरे, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, योगेश बारी आणि मनोज मराठे यांच्या पथकाने कारवाई करून संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान संशयिताकडून चोरीच्या पाच बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहेत.










