
जामनेर तालुक्यातील नागनचौकी येथील घटना; परिसरात शोककळा
जामनेर ( प्रतिनिधी ) – नीट (NEET) परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून जामनेर तालुक्यातील नागनचौकी येथील २० वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे नागनचौकीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


समर्थ ज्ञानेश्वर पाटील याला नीट परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात अपेक्षित गुण मिळाले नव्हते. त्यामुळे त्याने वर्षभर मेहनत घेऊन पुन्हा परीक्षेची तयारी केली. मात्र, दुसऱ्या प्रयत्नानंतरही अपेक्षित गुण मिळाले नाहीत. यामुळे तो मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे.
शुक्रवारी दुपारी त्याचे वडील जामनेर येथे गेले होते, तर आई घरी विश्रांती घेत होती आणि बहिण शाळेत गेली होती. याच दरम्यान समर्थने नागनचौकी येथील शेतालगतच्या शेडमध्ये गळफास घेत जीवन संपवले. काही वेळाने ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.
समर्थच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. कुटुंबीयांनी त्याच्यावर कोणताही अतिरिक्त दबाव टाकला नव्हता, मात्र स्पर्धात्मक परीक्षांमधील ताणतणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात व्यक्त होत आहे. या घटनेने नागनचौकीसह जामनेर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.










