एलसीबी आणि जिल्हापेठ पोलिसांची संयुक्त धडक; दोन जेरबंद, एक फरार
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी पसार झाला आहे. पोलिसांनी ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना १० जुलै रोजी पहाटे गुप्त माहिती मिळाली की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारील जी.एस. ग्राऊंड परिसरात काही जण मेफेड्रोनची विक्री करण्यासाठी येणार आहेत.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीयरीत्या सापळा रचला. मोटारसायकलवरून आलेल्या तिघांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, एक जण अंधाराचा फायदा घेत पसार झाला. उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी २ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचे ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन, तसेच २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर (एमएच-१९-डीजे-०१३२) मोटारसायकल जप्त केली. अशाप्रकारे एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणात जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरीओम नगर, मोहन टॉकीजजवळ, जळगाव) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी फरार आरोपी भैय्या सोनवणे (रा. कांचन नगर, जळगाव) याच्याकडून विक्रीसाठी मेफेड्रोन घेतल्याची माहिती दिल्याने त्याचा कसून शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या जयेश तायडे याच्याविरुद्ध रामानंद पोलीस ठाणे, जिल्हापेठ पोलीस ठाणे आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, सरकारी कर्मचाऱ्याला कामात अडथळा, गंभीर दुखापत आणि दरोड्यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२१७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार हेमराज भावसार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरम शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुरलीधर धनगर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण भालेराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल छगन तायडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे आणि पोलीस कॉन्स्टेबल उदय कापडणे यांनी सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली.









